शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (09:10 IST)

हे पवार साजरा करणार नाहीत वाढदिवस, हितचिंतकांनीही वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करु नयेत केले आवाहन

कोरोना संकटात घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर कुणीही त्यांचा वाढदिवस साजरा करु नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा येत्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. कोरोना संकटामुळे हा वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बांधवांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित करु नये. भेटीगाठी टाळाव्यात. त्याऐवजी आपली शक्ती कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी वापरावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. 
 
उपमुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या, पाठिराख्यांच्या, हितचिंतकांच्या, राज्यातील तमाम जनतेच्या शुभेच्छा माझ्यासाठी निश्चितंच खुप मोलाच्या आहेत. या शुभेच्छांचा स्विकार करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. कृपया त्या शुभेच्छा ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स्‌ॲप, ट्विटर आदी डिजीटल माध्यमांद्वारे अवश्य पाठवाव्यात. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावयाचे असल्यामुळे, तुमच्या स्वत:च्या, तुमच्या कुटुंबाच्या, आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी कुणीही घराबाहेर पडू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.