धोनीच्या वाढदिवसानिमित्त केदार जाधवचे भावनिक पत्र
धोनीच्या वाढदिवसानिमित्त भारताचा अष्टपैलू खेळाडू मराठोळा केदार जाधवनेही पत्ररुपी त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेट कसे खेळायचे हे शिकवतानाच आयुष्य कसे जगायचे हेही तुम्ही शिकवलेत, तुम्ही कित्येकांना योग्य दिशा दाखवली, आनंदाचे क्षण दिले, टीकेच्या लाटाही झेलल्या पण खंबीरपणे उभे राहिलात असे केदारने पत्रात म्हटले आहे. त्याने हे पत्र आपल्या टि्वटरवर पोस्ट केले आहे. माही भाई, गेली 15 वर्षे तुम्हाला खेळताना पाहिले तरी अजूनही आमचे मन भरले नाही. माझ्यासकट सगळ्या देशाला तुम्हाला पुन्हा एकदा खेळताना पाहायचे आहे. तुम्ही क्रीझवर उभे राहाल आणि ‘माही मार रहा है' म्हणत सगळा देश जल्लोष करेल, अशी भावनिक सादही केदारने घातली आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माही भाई! माझ्या आणि अनेक फॅन्सच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणचा हा छोटासा प्रयत्न. असे कॅप्शन टाकत केदारने पत्र शेअर केले आहे. वाढदिवसाला दरवर्षी आपण सोबत असतो, पण यावेळी लॉकडाउनमुळे साधी भेटही झाली नाही. मी टीव्हीवर जुन्या मॅचेस पाहताना माझी जर्नी रीकॉल करत होतो. आपल्या पार्टनरशिप्स, स्टम्पमागून तुम्ही दिलेल्या टिप्स, ऑफ द फिल्ड किस्से सगळेच डोळ्यांसमोरून जात होते. तेव्हाच डोक्यात आले की, तुमच्या येणार्या बर्थडेला काहीतरी मस्त गिफ्ट द्यावे. देशाला दोन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टेस्ट रँकिंगमध्ये पहिली पोझिशन मिळवून देणार्या कॅप्टनला मी गिफ्ट म्हणून तरी काय देणार? काहीच सुचले नाही तेव्हा डोक्यात आले तुम्हाला पत्र लिहावे. माझ्यासकट तुमच्या अगणित चाहत्यांच्या मनात काय आहे हे सांगावे.