1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (13:54 IST)

पालिकेच्या कर्मचार्‍यांची युपीएससी भवनात दारू पार्टी ; व्हिडिओ व्हायरल

अंबरनाथ नगरपलिकेच्या युपीएससी भवनमध्ये पालिका कर्मचारी दारु पार्टी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. याच यूपीएससी सेंटरमध्ये कोरोना काळात कोविड रुग्णालय उभारण्यात आले होते. त्याच ठिकाणी ही ओली पार्टी रंगल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. 
 
माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी ही बात समोर आणली असून आता पालिका या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळावे व अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, युपीएससी भवनाची निर्मिती केली आहे. याच सेंटमरध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचार्‍यांनी चक्क लायब्ररीसाठी राखीव असलेल्या खोलीत दारुची पार्टी केल्याची बाब समोर आली आहे.
 
कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक ही इमारत कशा स्वरुपाने तयार करण्यात आली आहे ते पाहण्यासाठी येथे गेले असताना ओली पार्टी सुरु असल्याची बाब समोर आली आहे. युपीएससी भवनामध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दारू पार्टी केली जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
 
शहराच्या पूर्व भागातील गावदेवी मंदिराशेजारी भव्य अशी UPSC भवनची दोन मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्यासाठी साधारण तीन कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तसेच आतील फर्निचरसाठी आता नव्याने साधारण अडीच कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
 
हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला असून त्याची व्हिडिओ क्लिप पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आणि आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात आली होती मात्र अजूनही कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.