अंबाबाईच्या उत्तरायणातील किरणोत्सवाला प्रारंभ
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायणातील किरणोत्सवाला प्रारंभ झाला. किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीच्या मुखकमलास स्पर्श करून किरणे एक मिनिट देवीच्या मुखावर स्थिरावले. पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाल्याने उत्तरायणातील किरणोत्सव दोन दिवस आधी होत असल्याच्या अभ्यासकांच्या मताला पुष्टी मिळाली आहे.
गेली अनेक वर्षे देवीच्या किरणोत्सव मार्गात येणार्या अडथळ्यांना दूर करण्यात देवस्थान समितीला यश आले आहे. मावळतीच्या किरणांनी 5.36 वा. महाद्वार कमानीतून मंदिरात प्रवेश केला. सूर्यकिरणे प्रखर असल्याने किरणोत्सव होणार, अशी भाविकांची आशा होती. किरणे 5.45 वा. गरुड मंडपात पोहोचली, 6.04 वा. किरणांनी कासव चौकात प्रवेश केला आणि एक मिनिटाने पितळी उंबरा ओलांडून किरणांनी गाभार्यात प्रवेश केला.
बरोबर 6.13 वा. कटांजन, 6.14 वा. देवीच्या चरणांना स्पर्श करून किरणे वर सरकली. 6 वाजून 16 मिनिटांनी किरणे देवीच्या गळ्यावरून मुखकमलावर सरकली. याठिकाणी एक मिनिट स्थिरावून किरणे 6.17 वाजता देवीच्या मुखकमलावरच लुप्त झाली.