मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अंबाबाई मंदिराची शिखरे सोन्याने मढविणार

साडेतीन शक्‍तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची पाचही शिखरे सोन्याने मढविण्यात येणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. लोकसहभागातून मंदिराची पाचही शिखरे सोन्याने मढवली जाणार आहेत.  यासाठी  स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. देशातील सुवर्ण मंदिर, अक्षरधाम, तिरुपती मंदिर, शिर्डीचे साई मंदिर आदी मंदिरांची शिखरे सोन्याने मढलेली आहेत. गेली सहा महिने देवस्थान समितीचा अभ्यास सुरू आहे. लोकसहभागातून मंदिर शिखर सोन्याने मढवण्याचा प्रस्ताव भाविकांकडून आला असून, देवस्थान समिती याबाबत सकारात्मक असल्याचे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
 
शिखर सोन्याने मढवण्याचा प्रथम प्रस्ताव मुंबई येथील सरकारी वकील अ‍ॅड. अविनाश खामखेडकर यांनी देवस्थान समितीपुढे ठेवला. देवीच्या मुख्य शिखराला सुवर्ण झळाळी देण्यासाठी एक किलो सोने देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. यानंतर देवस्थान समिती अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी याबाबत अभ्यास सुरू केला. त्यानुसार मंदिर शिखरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाचही शिखरांना सोन्याने मढवण्याची तयारी सुरू केली आहे. ही पाचही शिखरे सोन्याने मढवण्यासाठी साधारणत: 25 ते 30 किलो सोने लागेल, असा अंदाज कारागिरांकडून वर्तवण्यात आला आहे. लोकसहभागातून सोन्याची कमतरता भासली तर पाच किलो सोने देण्याची देवस्थानची तयारी असल्याचे सांगण्यात आले.