शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (15:56 IST)

अमित ठाकरे यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र

महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूवीर राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना म्हणजेच काका उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. अमित ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर हे पत्र पोस्ट करण्यात आलं आहे.
 
काय म्हटलं आहे पत्रात?
“महाराष्ट्र शासन कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाय योजना करते आहे. मात्र या आजाराचा प्रादुर्भाव सामान्य व्यक्तींना झाला तर त्यांनी काय करायचं यावरही काम करण्याची गरज आहे. तुम्ही या करता हेल्पलाईन सुरु केली याची मला पूर्णपणे माहिती आहे. तरीही अनेक नागरिकांना हा आजार झाल्यानंतर काय करावं हे समजत नाही. कुठे जायचं, कुणाला संपर्क करायचा हे माहित नसते. यासंदर्भात आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. उपाचारासंदर्भात अनेक नागरिकांना आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीवर मला असे वाटते की, सध्याच्या युगात बहुतांश लोकांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत, त्यामुळे आपण जर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सगळ्या रुग्णालयांना जोडून एक APP तयार केला आणि त्यामध्ये असलेल्या कोविड १९ आणि कोविड १९ शिवाय अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची माहिती तसेच तिथे उपलब्ध असणाऱ्या बेड्सची माहिती रोजच्या रोज अपडेट केली तर लोकांना ही माहिती मिळणं सोपं जाईल. यामुळे सामान्य लोकांना नाहक होणारा त्रास होणार नाही.”