उद्धव ठाकरे यांची मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती
राज्यात करोनाचं संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरुन वेगळीच चर्चा रंगत आहे. राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून तीन आठवडे उलटले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीला राज्यपालांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापही निर्णय प्रलंबित ठेवला असल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती पीटीआयद्वारे दिली गेली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे. ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. असे वृत्तं पीटीआयने दिले आहे.