शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (13:39 IST)

अमोल कोल्हें बैलगाडा शर्यतीत घोडीवर झाले स्वार

खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द पाळला आणि अखेर बैलगाडापुढे घोडीवर स्वार होऊन घाट गाजवला आहे. कोल्हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार झाल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीपूर्वी दिलेले वचन त्यांनी यानिमित्ताने पूर्ण केले आहे. 
 
बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर अमोल कोल्हे हे दिलेला शब्द पाळणार का? असा खोचक टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला होता. मात्र अमोल कोल्हे यांनी यातून प्रत्युत्तर दिलं आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत आढळराव आणि कोल्हे यांच्यात द्वंद्व सुरु असते. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले तेथे कोल्हे घोडीवर स्वार झाले. बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते.  
 
अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार. तसेच दुसरा शब्द बैलगाडा मालकांना देतो की ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते.
 
सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थींसह बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर बैलगाडा शर्यती पार पडत आहेत.