राज्य सरकारकडून विविध पुरस्कारांची घोषणा; या मान्यवरांचा होणार सन्मान
सन 2020-21 या वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (मरणोत्तर) पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत त्याची घोषणा करण्यात आली आहे. गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंडित चौरसिया यांची निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली होती.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाचा हा पुरस्कार अनुक्रमे आतांबर शिरढोणकर आणि संध्या रमेश माने यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पुरस्कार आणि वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत तमाशा लोककला पुरस्कार देण्यात येणार असून “पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर” असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. किर्तन/ समाजप्रबोधन पुरस्कार दिला जाणार असून “ह.भ.प. शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव” असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना आता “राजर्षी शाहू महाराज” वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना म्हणून ओळखली जाईल.