1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (13:12 IST)

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

Appointment of global teacher Ranjit Singh Disley as World Bank Education Advisor
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची (Ranjit Singh Disley) जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी  ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 
 
याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले.
 
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले 
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. तब्बल सात कोटी रक्कमेचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले होते. यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल, असा त्यांचा मानस होता. 
 
इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. या मुलांची निवड बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी करणार असून, पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.