मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (10:09 IST)

पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं

दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ज्या मित्राकडे पेट्रोलची मागणी केली त्यालाच मित्रांनी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरात समोर आली आहे. ही घटना 19 सप्टेंबर रोजी भरदुपारी एकच्या सुमारास गारखेडा परिसरात घडली. या घटनेत दिनेश रुस्तमराव देशमुख गंभीररित्या होरपळला आहे.
 
खासगी वाहन चालक दिनेश हा सकाळी घरातील काम आटोपून बाहेर पडला. साडेदहाच्या सुमारास मित्र किरण बालाजी गाडगीडे हा घराजवळ आला. त्यानंतर दोघेही दारू पिण्यासाठी किरणच्या अड्ड्यावर गेले. त्यानंतर दोघेही दिनेशच्या घराजवळील रिकाम्या प्लॉटवर आले. तिथं गप्पा मारत असतानाच दुपारी एकच्या सुमारास नितीन सोनवणे आणि भागवत गायकवाड तिथं आले. त्यापैकी नितीननं दुचाकीसाठी थोडे पेट्रोल दे, अशी मागणी केली. त्याला दिनेशने नकार दिला. पण किरणच्या सांगण्यावरुन दिनेशनं त्याला दुचाकीची चावी देत पेट्रोल काढण्यास सांगितलं.
 
नितीननं पेट्रोल काढल्यानंतर थोड्या पेट्रोलमध्ये काय होणार म्हणत आणखी पेट्रोलची मागणी केली. तेव्हा मात्र दिनेशनं स्पष्ट नकार दिला. त्याचा राग आल्याने भागवतनं चिथावणी देत नितीनला त्याच्या अंगावर पेट्रोल फेकण्यास प्रवृत्त केलं. नितीननं पेट्रोल फेकताच दुसरीकडून किरणनं माचीसची पेटलेली काडी त्याच्या अंगावर फेकली. त्यामुळे या आगीत दिनेश 25 टक्के भाजला. त्याला कुटुंबियांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं.
 
याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.