गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (12:55 IST)

मुख्यमंत्र्यांचा फोन येताच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय

राज्यात भाजपा-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वासाठी कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्याशी संपर्क साधून समृद्धी महामार्गाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या महामार्गाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
 
सध्या राज्यात सुरू असलेल्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. त्यानुसार तत्कालीन भाजपा सरकारमधील समृद्धी महामार्ग असल्याने या मार्गाच्या कामाकडे आता राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला होता.
 
समृद्धी महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ७०१ किलोमीटरच्या या महामार्गापैकी सुमारे ५०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. यातील नाशिक जिल्हयातून १०० किलोमीटरच्या या महामार्गासाठी ८ हजार ३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. जिल्हयातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून हा महामार्ग जातो. १० जिल्हे आणि ३९२ गावांमधून जाणारा हा महामार्गामुळे राजधानी ते उपराजधानीचे अंतर सात तासांपर्यंत कमी होणार आहे.
 
नाशिक हे कृषी बरोबरच उद्योगाचेही महत्त्वाचे केंद्र आहे. याशिवाय पुणे-मुंबई-नाशिक या सुवर्ण त्रिकोणातही नाशिकचा समावेश आहे. नाशिकला समृद्धी महामार्गाशी जोडावे, अशी मागणी होती. नाशिक हे कृषी आणि औद्योगिक समृद्धी विकासाचे केंद्र व्हावे, सिन्नर तालुक्यातील गोंदे येथील कोरडवाहू जमीन विकसित व्हावी व ओझर येथील विमानतळांचा विकासासाठी उपभोग घेण्याच्या अनुषंगाने देखील नाशिकला समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी जोडरस्ता देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले होते.
 
सध्या जिल्ह्यात तीन टप्प्यामध्ये महामार्गाचे काम सुरु असून कामाची गती वाढवत डिसेंबरअखेर उर्वरित काम पूर्ण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांनी दिली. कामकाजात कोणतीही अडचण येणार नाही तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कामकाजाला गती देण्यासाठी मार्ग काढला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
 
आपण स्वत: महामार्गाच्या कामकाजाची पाहणी करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील महामार्ग संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी तातडीने माहिती जाणून घेतली. समृद्धी महामार्गात जमिनीसंदर्भात निर्माण होणारे वाद आणि आक्षेप यावर सकारात्मक तोडगा काढून मार्ग पूर्ण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील ज्या गावांचे अद्यापही आक्षेप आहेत, त्याबाबतची माहिती जाणून घेतली.
 
या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीपेक्षा मोबदला कमी मिळाल्याचा आक्षेप काही ग्रामस्थांनी घेतला आहे. या जमिनींच्या गटाची पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे. इगतपुरी तालुक्यातील अवचितवाडी आणि सिन्नर तालुक्यातील सोनांबे, कोनांबे येथील ग्रामस्थांचा मोजणीच्या प्रक्रियेला आक्षेप आहे. त्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. या महामार्गाच्या कामाबाबत काही गावांमध्ये अडचणी असल्या तरी देखील त्या स्थानिक पातळीवर सोडवून लागलीच काम पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. तसेच, या तीन गावांची पुन्हा मोजणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
 
गेल्या २ महिन्यापूर्वीच या महामार्गाचा पहिला टप्पा खुल करण्याचा मुहूर्त टळला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांनी अनेकदा या महामार्गाची पाहणी केली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे निर्णय रद्द करतांना भाजप सरकारच्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम सध्या शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू आहे. त्यातीलच समृध्दी महामार्ग हा एक प्रकल्प. त्यामुळे आता ज्या ज्या जिल्हयांमधून समृध्दी मार्ग जातो तेथील जिल्हाधिकाऱ्याशी शिंदे यांनी चर्चा करत या महामार्गातील सर्व अडचणी, अडथळे दूर करण्याचे आदेश दिले आहेत.