औरंगाबादचं संभाजीनगर होणार- फडणवीसांचं स्पष्टीकरण
औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली होती.
या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल केला होता.
"ही नावं द्यायची आहेत. आमचा अजेंडा हाच आहे. त्यामुळे ज्या सरकारकडे बहुमत आहे, त्याच सरकारचं मंत्रीमंडळ त्याला मान्यता देईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही नावं आमच्या अस्मितेची आहेत, महत्त्वाची आहेत. त्यामुळे अवैध बैठकीत ती देण्यता येऊ नयेत. बहुमत असलेल्या सरकारसमोर ती ठेवण्यात यावीत. आमच्या पुढच्या मंत्रीमंडळ बैठकीत ती समोर ठेवण्यात येतील", असं फडणवीस यांनी सांगितलं.