शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (13:18 IST)

अयोध्या दौरा: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अयोध्येत दाखल, घेतले श्रीरामाचे दर्शन

facebook
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले आहे.
शिंदे-फडणवीस यांच्यासोबत मंत्रिमंडळातील मंत्री, शिवसेना-भाजपचे आमदार आणि खासदार उपस्थित आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आज एकाच हेलिकॉप्टरने अयोध्येत दाखल झाले.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. या दौऱ्यासाठी शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आल्याचं दिसून येतं.
 
शिंदे-फडणवीस हे एका खुल्या वाहनातून राम मंदिराच्या दिशेने गेले. यावेळी बाईक रॅलीही काढण्यात आली.
अयोध्येतील रस्ते भगव्या रंगाने रंगल्याचं यावेळी दिसून आलं. शिंदे फडणवीस यांनी या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्याचं यावेळी दिसून आलं.
 
दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "रामाचा आशीर्वाद मिळाला आहे. बाळासाहेबांचं तसंच कोट्यवधी रामभक्तांचं राम मंदिर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. या सगळ्या गोष्टींचा आनंद आहे."
रामजन्मभूमीतून प्रभू रामचंद्रांचं आशीर्वाद घेतलं आहे. येथून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र सुजलाम कसा होईल, यासाठी दिवस-रात्र एक करून आमचं आयुष्य जनतेला समर्पित करू, असं शिंदे म्हणाले.
 
बळीराजावरचं संकट-अरिष्ट दूर होवो, महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे-समाधानाचे दिवस येवोत, हीच मागणी आम्ही श्रीरामासमोर केलं.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज दर्शन घेऊन प्रचंड आनंद झाला आहे. रामाकडून आम्हाला सर्व काही मिळालं आहे, आम्ही काहीच मागितलेलं नाही."
एकनाथ शिंदे हे काल (8 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता मुंबईहून विमानाने लखनौच्या दिशेने रवाना झाले होते.
 
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते लखनौमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशात जोरदार तयारी करण्यात आली आहे. लखनौ विमानतळावर एका बँड पथकाने शिंदे यांचं स्वागत केलं.
 
एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
 
शिंदे हे दुपारी 12 च्या सुमारास प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतील. ते हनुमान गढी येथेही जाऊन दर्शन घेणार असून भव्य राम मंदिराच्या बांधकामाची पाहणीही करणार आहेत.
दरम्यान, अयोध्येत संत-महंतांच्या भेटी घेऊन आशीर्वादही ते घेणार आहेत.
 
त्यानंतर, रात्री उशिरा एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची लखनौ येथे भेट होईल.
 
उत्तर प्रदेशातील महाराष्ट्र भवन आणि मुंबईतील उत्तर भारतीयांसह अन्य मुद्दय़ांवर दोन्ही नेते चर्चा करतील.
 
अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा विषय
अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असून प्रभू श्रीरामचंद्राच्या आशीर्वादानेच आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळालं आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लखनौमध्ये दाखल झाल्यानंतर केलं.
 
लखनौमध्ये पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट करून आरपली प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणाले, “जय श्रीराम, हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, असे नारे देत आज लखनऊ विमानतळावर माझे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 
“अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असून प्रभू श्रीरामचंद्राच्या आशीर्वादानेच आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळालं आहे.
 
प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी अयोध्येला आले आहोत.
 
ज्या उत्साहात आमचं येथे स्वागत झाले ते पाहता आमचाही उत्साह द्विगुणित झाला आहे.
 
“राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मी पहिल्यांदाच अयोध्येला आलो असून इथले वातावरण आणि स्वागत पाहून आनंद आणि समाधान वाटत आहे. या दौऱ्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
असा असेल शिंदेंचा दौरा
* 9 एप्रिलला सकाळी 10 वाजता ते अयोध्येकडे रवाना होतील.
* 11 वाजता हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहचतील.
* 12 वाजता राम मंदीराच्या ठिकाणी महाआरती करतील. त्यानंतर राम मंदिराचं काम सुरू असलेल्या ठिकाणाची पाहणी करतील.
* दुपारी 2.30 च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन पुढे महंतांच्या कार्यक्रमासाठी लक्ष्मण किल्यावर दाखल होतील. तिकडच्या महंताकडून धनुष्यबाण स्विकृतीचा कार्यक्रम होईल.
* संध्याकाळी 6 वाजता शरयु नदीची आरती केली जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदे लखनऊकडे रवाना होतील.
* रात्री 9 वाजता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे भेटीसाठी पोहचतील.
* साधारण रात्री 10 वाजता शिंदे मुंबईकडे रवाना होतील.
 
संजय राऊतांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली.
 
महाराष्ट्राचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले आहेत. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, असं राऊत म्हणाले.
 
पक्ष सोडताना त्यांना रामाची आठवण झाली नाही. धर्माच्या नावावर पर्यटन सुरू आहे, असं राऊत म्हणाले.