सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (09:34 IST)

कॉंग्रेसच्या या आमदाराला भाजपची कोट्यावधींची ऑफर ?

इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकार यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्यासाठी संपर्क केल्याचा खळबळजनक आरोप खोसकर यांनी केला आहे. मात्र, मी त्यांना घरी नसल्याचे सांगत परतवून लावले. तसेच आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे विविध वाहिन्या आणि  सोशल मिडीयावर ही बातमी पसरली असून एकच खळबळ उडाली. सोबतच जेष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांनी याबाबत खुलासा करताच चर्चेला अजून उधान आले आहे. यावेळी खोसकर यांनी  माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अजित पवार यांना  स्वतः ही माहिती कळवली. दरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार हे जयपूरला रवाना झाले असून खोसकर यांना काँग्रेस नेते स्वतः विमानाने जयपूरला घेऊन गेले आहेत.
 
भाजपकडून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला होता. तसेच शिवसेनेनेही आपल्या आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे म्हटले आहे. त्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. दुसरीकडे राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपकडे संख्याबळ नसल्याने त्यांना मित्रपक्ष शिवसेनेच्या पाठींब्याची गरज आहे. यामुळे भाजप कर्नाटकप्रमाणे मार्ग अवलंबवू शकते अशी शिवसेनेला भीती वाटत आहे.
-------------------