सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (16:12 IST)

भाजपची अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्याभोवती फिरणारं नाट्यसत्र सध्या राज्यात सुरू आहे.यात आता एका भाजपा आमदाराने आता रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रत्नागिरी पोलिसांकडे केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आपण न्यायालयाकडे जाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
 
भातखळकर म्हणतात, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अन्याय्य अटकेप्रकरणी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीरपणे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव आणला. अटके प्रकरणी जी कायदेशीर प्रक्रिया पार पाडायला हवी होती,ती पार पाडली नाही, आपल्या पदाचा गैरवापर केला आणि परब यांनी मंत्री असताना व्यवस्थापनात हस्तक्षेप केला,अडथळा आणला.त्यामुळे त्यांच्याविरोधात २४ तासांच्या आत एफआयआर दाखल करावा अशी मागणी मी रत्नागिरीच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे इमेलद्वारे,पत्र पाठवून केली आहे.जर २४ तासात एफआयआर दाखल झाला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू आणि पोलिसांच्या न्याय प्राधिकरणाकडेही दाद मागू.
 
नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नेमके कुणी दिले याची सगळीकडे चर्चा असताना,शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते अटकेबाबत बोलताना दिसून येत आहेत.