राणेंनी ट्वीटरवरुन आपली पहिली प्रतिक्रिया दिली, ‘सत्यमेव जयते’ म्हणत व्यक्त केल्या भावना
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या नाट्यमय घडामोडी मंगळवारी दिवसभर घडत होत्या. मात्र या नाट्यमय घडामोडींनंतर महाड कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केल्याने समर्थकांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रकरणातून जामिनावर बाहेर पडताच नारायण राणे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र राणेंनी ट्वीटरवरुन आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.सत्यमेव जयते अशा दोन शब्दांत नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नारायण राणेंविरोधात राज्यभरात एकच जनआक्रोश पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी करत त्यांना अटक करा अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जात होती.तर मुंबई,नाशिक,पुणे,नाशिक,औरंगाबादसह ठिकठिकाणी शिवसेना-भाजपा असा संघर्ष निर्माण झाला होता.अशातच महाड पोलिसांनी नारायण राणे यांना सायंकाळी ताब्यात घेतले.मात्र मंगळवारी उशीरा महाडमधील कोर्टाने राणेंचा जामीन मंजूर केला.यानंतर पुन्हा एकदा राणे ठाकरे सरकावर जहरी टीका करणार का? अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र राणे यांनी सध्या तरी बोलणं टाळत,सत्यमेव जयते असं म्हटलं आहे.