बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (09:52 IST)

भाजप सत्तास्थापन करणार नाही, आमच्या शुभेच्छा – चंद्रकांत पाटील

भाजपने देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यपालांना सत्तास्थापनेविषयीचा आपला निर्णय कळवला आहे. १६ दिवस होऊन गेल्यानंतर आज सत्तास्थापनेबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्यात सरकार कोण स्थापन करणार याविषयीचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या निर्णयाची माहिती दिली.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली होती. त्यानंतर भाजपने कोअर कमिटीची बैठक घेऊन सत्तास्थापनेच्या सर्व शक्यतांची चाचपणी केली. या बैठकीत भाजपमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले.
 
यातील एक गट अल्पमतातील सरकार स्थापनेचा आग्रह करत होता, तर दुसरा गट असं अल्पमताचं सरकार स्थापन करणं धोक्याचं असल्याचं म्हणत विरोध करत होता. त्यामुळे ही बैठक बरिच लांबली. स्वत: अमित शाह यांनी देखील महाराष्ट्रातील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.