शेतकरी आंदोलनाला यश; सरसकट कर्जमाफीला सरकार तत्वत मान्य
सुरुवातीला नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून सुरु झालेल्या आणि नंतर नाशिकमध्ये केंद्र झालेल्या शेतकरी संपाच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी तत्वत: मान्य असल्याची घोषणा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ते सुकाणू समितीसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
सह्याद्री अतिथीगृहात सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाची बैठक आज दुपारपासून सुरु होती. सुकाणू समिती आणि मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत तेही बहुतांश गुन्हे मागे घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
राजू शेट्टी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे उद्या होणारे तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरील ठिय्या आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.