गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 13 मे 2024 (22:45 IST)

मुंबईत वादळी वाऱ्यामुळे हाहाकार, घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू

या हंगामातील पहिल्या पावसासह मुंबईत धुळीचे वादळ आले आहे. या वादळामुळे घाटकोपरमध्ये विध्वंस झाला. 
वादळामुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये 100 फूट लांबीचे होर्डिंग उन्मळून पडले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर 59 जण जखमी झाले. दुपारी 3.30 च्या सुमारास जिमखान्याजवळ हा अपघात झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके तात्काळ मदत देण्यासाठी घटनास्थळी रवाना झाली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मदत आणि बचाव कार्यादरम्यान क्रेन आणि गॅस कटरचा वापर करण्यात आला आहे. 
 
घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मुलुंड परिसरात होणारी निवडणूक रॅली रद्द केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) रेल्वे आणि जाहिरात कंपनी इगो मीडिया  यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. रेल्वे आणि जाहिरात कंपनीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे बीएमसीचे म्हणणे आहे
 
मुंबईतील घाटकोपर, वांद्रे कुर्ला आणि धारावी भागात पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे हवाई सेवेवरही परिणाम झाला . दुसरीकडे, मुंबई विमानतळावरील हवाई सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. 
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

Edited by - Priya Dixit