अजित पवार-शाहू महाराज भेटीवर छत्रपती संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेत चर्चा केली. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती.
दरम्यान मराठा आरक्षणावरुन सध्या आक्रमक असणारे छत्रपती संभाजीराजे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी पुण्यात उदयनराजेंची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भेटीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “अजित पवार यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झालं याची माहिती नाही. ही भेट होणार आहे याची मला कल्पना नव्हती. मला राजमहालातून कळवण्यात आलं होतं. पण काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे”.