शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (09:38 IST)

मंत्रालयाकडे न फिरकलेले मुख्यमंत्री कोणत्या निकषावर ‘टॉप फाईव्ह’मध्ये?; चंद्रकांत पाटील

गेल्या सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. मग कशाच्या निकषावर ते पाच टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
 
‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’ने ‘मूड ऑफ द नेशन’ या आधारवर एक सर्व्हे केला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहे. हा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ते एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते लोकांसठी गेल्या ८०-९० दिवसांपासून उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? असा सवाल करतानाच त्यांना क्रमांक मिळावा असेच निकष असतील असा चिमटाही पाटील यांनी काढला.
 
कोल्हे गोडसेशी सहमत आहेत का?
यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने त्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी एक अभिनेता म्हणून करणे यात मला काही गैर आहे असं वाटत नाही. नथुराम गोडसेंच्या विचारांशी ते सहमत आहेत का ते त्यांनी जाहीर करावं. एक अभिनेता कुणाचीही भूमिका करू शकतो. उद्या अफझल खानाचीही भूमिका करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.