मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (21:47 IST)

राज्यातल्या 5 पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी

Complaints from BJP against Chief Minister Uddhav Thackeray in 5 police stations in the state
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याविरोधात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर राणे यांना झालेली अटक यामुळे शिवसेना-भाजप आमने सामने आले आहेत. शिवसैनिकांनी राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे.
 
भाजपने मुख्यमंत्र्यांविरोधात यवतमाळ आणि नाशिकमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजपने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या 5 पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत. 
 
तर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले यांनी आज तक्रार अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 
युवा सेनेचे वरूण सरदेसाई यांना तोडफोड केल्याबद्दल शाबासकी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत, संजय राऊत यांच्या लेखामधील उल्लेख आणि त्यांचे होर्डिंग लावून सामाजिक शांतता धोक्यात आणल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द काढल्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.