1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:27 IST)

चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अमोल कोल्हे यांना काँग्रेसचा थेट इशारा

नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना काँग्रेसने थेट इशारा दिला आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे हे लोकप्रतिनिधी असल्याने गोडसेंना हिरो बनवण्याचं काम करू नये. याबाबत शरद पवारांनी लक्ष घालावं असंही पटोले म्हणाले आहेत.
 
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत कलाकार नाहीत, विशेष करुन गोडसे विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघातक विचारांना ताकद मिळण्यासारखं आहे. अशा प्रवृत्तीला हिरो बनवण्याचं काम जर होत असेल तर ते चुकीचं आहे.
 
या देशाला फक्त महात्मा गांधी यांचा विचारच तारू शकतो, आणि हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो, हे सातत्याने सिद्ध झालं आहे. गोडसे प्रवृत्तीन देश फुटेल आणि म्हणून अशा विघातक विचारांना हिरो बनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.