मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (22:16 IST)

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मुलगा बसल्याने वादंग; विरोधकांची जोरदार टीका, डॉ. श्रीकांत शिंदेंनी दिले हे स्पष्टीकरण

Shrikant Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे बसल्याचा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. यावरुन विरोधकांनी श्रीकांत शिंदे यांना चांगलेच लक्ष्य केले आहे. तर, यासंदर्भात श्रीकांत शिंदे यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला आहे.
 
एकनाथ शिंदे हे केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले असून त्यांच्यावतीने सर्व निर्णय भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असल्याचे बोलले जाते. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बसल्याचा आरोप करण्यात येत असून या संदर्भात विरोधकांकडून टिकेचा भडीमार सुरू झाला आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि खुद्द मुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे.
 
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एका फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदे हेच राज्याच्या कारभार सांभाळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या फोटोवरून पुन्हा एकदा राजकारण तापू लागले असून विरोधी पक्षनेत्यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
 
रविकांत वरपे यांनी सदर फोटो ट्विट करत म्हटले आहे की, ‘खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?’ अशी टीका वरपे यांनी केली आहे.
 
त्याचवेळी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही या प्रकरणी हल्ला बोल केला असून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणे हा अपराध आहे. आमचे नेते आदित्य ठाकरे असे कधीही वागले नाहीत, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात म्हणाले, ‘राजा का बेटा राजा. चालणार नाही, ‘ असे खुद्द मुख्यमंत्री म्हणाले होते. आदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळाल्यावर यांनीच आक्षेप घेतला होता. आता श्रीकांत शिंदेंच्या या फोटोनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येत असलेल्या आरोपांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘ मी खासदार आहे, कुठे बसायचे आणि कुठे नाही हे मला कळत. हे माझे घरचे ऑफीस आहे, मी ज्या खुर्चीवर बसलो आहे, ती माझीच खुर्ची आहे. मात्र माझ्या मागे जो बोर्ड दिसत आहे तो तिथला नाही. माझ्या मागे बोर्ड होता याची मला कल्पना देखील नव्हती, असे स्पष्टीकरण आता श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.