शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (22:05 IST)

श्रीसप्तशृंगी मातेच्या पूजा विधीमध्ये मोठा बदल

saptashringi
नाशिक श्री सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचा शेंदूर काढल्यानंतर देवीचे वेगळे रुप भक्तांना पहायला मिळत आहे. त्यातच नवरात्रोत्सव येत्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. आणि आता सप्तशृंग देवस्थान ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देवीच्या पूजा विधी संदर्भात आहे. आणि तो येत्या नवरात्रीपासूनच लागू होणार आहे.
 
ट्रस्टने म्हटले आहे की, सप्तशृंगी मातेच्या दैनंदिन पुजाअर्चा आणि विधीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पंचामृत अभिषेक पूजेचा समावेश आहे. मात्र, या पुजेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. श्री भगवती स्वरुप मूर्ती संवर्धन दरम्यान शेंदुर काढल्यानंतर दैनिक स्वरुपात होणा-या पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात अर्थात सामग्री वापरावर काही प्रकारात बदल करण्यात आला आहे. भगवती स्वरुपावर पाणी, दुध, लोणी, मध, साखर, नारळ पाणी तसेच तुपाचा वापर करता येणार नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार भाविकांच्या योगदानातून श्री भगवतीची साधारण २५ किलो चांदी धातुची उत्सव मुर्ती तयार करण्यात आली आहे. त्यावर पंचामृत महापूजा विधीवतपणे करण्याचे नियोजन विश्वस्त संस्था व पूजारी वर्गाच्या मार्गदर्शनानुसार निश्चित करण्यात आले आहे.
 
ट्रस्टने पुढे म्हटले आहे की, येत्या घटस्थापनेच्या दिवसापासून म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी श्री भगवती मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. यापुढील सर्व पंचामृत महापूजा विधीवत पद्धतीने श्री भगवतीच्या उत्सव मूर्तीवरच होणार आहेत. याबाबत धार्मिक गुरु व स्थानिक पुजारी वर्गाने देखील संमती दर्शवून मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सदर बदल विचारात घेऊन यापुढे भाविकांनी उत्सव मूर्तीवरील पूजेला प्राधान्य देणे अंत्यत आवश्यक आहे. त्यामुळे यापुढील विश्वस्त संस्था व पूजारी वर्गाने निर्धारीत केलेले महत्त्वाचे सण, उत्सव व मुहूर्त वगळता इतर सर्व दिवशी चांदीच्या उत्सव मूर्तीवरच श्री भगतवीची पंचामृत महापूजा केली जाईल, असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.