मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (16:29 IST)

कोरोना लॉकडाऊन - 'उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करून मागितलं सहकार्य'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन करून राज्यात लॉकडाऊन लागल्यास सहकार्य करा, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं बोललं जात आहे.
सोबतच राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही याबाबतचा निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक ऑनलाईन होणार आहे.
या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन
राज्याल लॉकडाऊन लावण्याची गरज पडल्यास सहकार्य करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना केलं आहे.
मनसेच्या अधिकृत ट्वीट हँडलवर म्हटलं आहे की, "राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केलं आहे."
देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबईची स्थितीही चिंताजनक आहे. नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाउन लावू असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला होता. जर नागरिक स्वतःहून कोरोनाच्या नियमांचे पालन करणार नसतील तर दोन दिवसात याबाबत निर्णय घेऊ असे देखील मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी उद्योजक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, व्यायामशाळा चालक, मराठी नाट्य निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी ऑनलाइन संवाद साधला.
गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडूनही सूचना घेतल्या जात आहेत.