शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (15:29 IST)

जिल्हा कारागृहात कोरोनाची एंट्री, १३ कैदी पॉझिटिव्ह

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा कारागृहातील १३ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून सर्वांना उपचारासाठी जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
 
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात २८५ नवे रुग्ण आढळून आले. शासकीय कार्यालय, रुग्णालयानंतर आता जिल्हा कारागृहामध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केली. जिल्हा कारागृहामध्येदेखील काही कैद्यांना कोरोना आजाराची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनाने त्यांचे नमुने देऊन तपासणी करून घेतली होती. यात १३ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
 
दरम्यान, जळगाव जिल्हा कारागृहात २०० कैद्यांची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत ४५४ कैदी दाखल आहेत. सर्व कैद्यांचे कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. काही कैद्यांना कोरोनाचे लक्षणे जाणवत असल्याने त्यांची बुधवारी तपासणी करण्यात आली होती. सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारार्थ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले
 
दरम्यान, कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. कारागृहातून कैद्यांच्या पलायनामुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतानाच आता कारागृहात करोनाचा शिरकाव झाल्याने इतर कैद्यांच्या सोशल डिस्टन्सिंगसह करोनाबाबतच्या इतर नियमांचे पालन करण्याचा प्रश्न कारागृह प्रशासनासमोर उभा राहिला आहे.