'या' गावात छापत होते बनावट नोटा, दोघा संशयितांना अटक
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कळमसरे या गावी येथे पोलीसांनी बनावट नोटांची निर्मिती उघड झाली आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे. बनावट चलनी नोटा आणि यंत्रसामग्री असा ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरपूर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कळमसरे या गावी छापा टाकून बनावट नोटांची निर्मीती उघडकीस आणली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या माहितीनुसार कळमसरे या गावी संतोष गुलाब बेलदार याच्या घरात बनावट नोटांची निर्मिती सुरु होती. या ठिकाणी छापा टाकत असतांना संशयित त्यांच्या ताब्यातील बनावट नोटा जाळतांना आढळून आले. हुबेहुब दिसणाऱ्या दोनशे रुपयांच्या पाच चलनी नोटा, नोटा तयार करण्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर, कागद, कटर, कैची, काटकोन, स्केल पट्टी, हिरव्या व सिल्वर रंगाचे टेप असा एकुण ४८ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. संतोष गुलाब बेलदार व गुलाब बाबु बेलदार या दोघांना पोलीसांनी अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.