बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (09:06 IST)

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या ९ गावांमध्ये संचारबंदी

कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या ९ गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
 
कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव-शिरढोण, आणि कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कलम १४४ अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा ,जीवनाश्यक सेवेतील आस्थापना आणि मंदिर समितीचे पासधारक अधिकारी-कर्मचारी यांना यातून वगळण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.