रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (16:11 IST)

राज्यात यंदाही दहीहंडी आयोजनाला परवानगी नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई सहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.करोनामुळे मागील वर्षी मुंबई,ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता.यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली.तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितलं.
 
दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रभाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितलं असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं.हा उत्सव जागतिक स्तरावर टीकावा अशी बाजू समन्वय समितीने मांडली.गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली.मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितलं.
 
एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल.यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही.असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.