शाहरुखकडे २५ कोटींची मागणी, वानखेडेंना ८ कोटी!’
आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या साक्षीदाराने एनसीबी चे झोनल प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर केपी गोसावीसोबत संगनमत करून बदल्यात पैसे मिळवल्याचा आरोप केला आहे केपी गोसावी यांचे अंगरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साल यांनी हा दावा केला आहे.
गोसावी तोच खासगी तपासनीस आहे ज्याने २ ऑक्टोबर रोजी अटकेच्या दिवशी आर्यनसोबत सेल्फी काढला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी एनसीबीने म्हटले होते की ते बाह्य तपासनीसांचीही मदत घेतात. या आरोपाबाबत समीर वानखेडे यांनी या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाल्याचा इन्कार केला आहे. त्याला सडेतोड उत्तर देऊ, असे ते म्हणाले. गोसावी यांचे अंगरक्षक प्रभाकर यांनी माध्यमांशी बोलताना नोटरी प्रतिज्ञापत्रात अनेक खुलासे केले आहेत. गोसावी आणि सॅम डिसूझा यांच्यात २५ कोटींबद्दल बोलताना ऐकले होते आणि १८ कोटी रुपयांमध्ये सौदा ठरल्याचा दावा त्यांनी केला. गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना १८ पैकी ८ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
केपी गोसावींकडून ही रोकड घेतली आणि सॅम डिसूझा यांना दिल्याचेही प्रभाकरने म्हटले आहे. पंचनाम्याचे कागद सांगून १० कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सही केल्याचे प्रभाकरने सांगितले.त्याचे आधार कार्ड विचारण्यात आले. या अटकेबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. एनसीबीने ६ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात प्रभाकरचे नाव साक्षीदार म्हणून समाविष्ट करण्यात आले होते.
गोसावी हे अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याचेही प्रभाकरने सांगितले. तो म्हणाला की, त्याला त्याच्या जीवाला आणि स्वातंत्र्याला धोका वाटत आहे, म्हणून त्याने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.