शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (10:37 IST)

राजपथावर महिला बचतगटांचे प्रदर्शन

महाराष्ट्राच्या स्टॉलवर गुळ, काजु व अन्य पदार्थांची विक्रमी विक्री
 
येथील राजपथावर सुरु असलेल्या देशभरातील महिला बचत गटांद्वारे निर्मित वस्तुंच्या प्रदर्शनात महाराष्ट्रातील वसई-विरार महानगर पालिकेच्या स्टॉलवरील 150 किलो ऑर्गानीक गुळ पहिल्या तीन दिवसात विकला गेला.तर 70 हजार रुपयांच्या काजुचीही विक्री झाली. राज्यातील अन्य 11 बचत गटांच्या स्टॉलवरील वस्तुंचीही विक्रमी विक्री होत आहे.
 
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पं. दिनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत देशातील महानगर पालिका व नगरपरिषदांच्या महिला बचत गटांच्या वस्तुंचे ‘शहरी समृध्दी प्रदर्शन’ येथील इंडिया गेट परिसरातील राजपथाच्या लॉनवर आयोजित केले आहे. देशभरातील 200 स्टॉल याठिकाणी असून महाराष्ट्रातील  एकूण 12 स्टॉल येथे उभारण्यात आले आहेत.
 
150 किलो गुळ व 70 हजारांच्या काजुची विक्री
 
वसई-विरार महानगर पालिकेअंतर्गत कार्यरत स्वकृता व एकविरा महिला बचत गटांचे दोन स्टॉल येथे आहेत. एकविरा महिला बचत गटाच्या प्रमुख रंजना देशपांडे सांगतात, या प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसातच आमच्याकडील 150 कि.ग्रॅ. गुळाची विक्री झाली. आम्ही सोबत आणलेला संपूर्ण गुळ संपला असून प्रती किलो 80 रुपये प्रमाणे 12 हजार रुपयांच्या गुळाची  विक्री झाली. या स्टॉलवर तुळशी, निलगीरी आदी फ्लेवरची मधही विक्रीसाठी आहे. स्वकृता बचत गटाच्या मिताली साळुंखे आणि अंजली कमद सांगतात, त्यांच्या स्टॉल वरील 70 हजारांचा काजु विकला गेला आहे. 250 कि.ग्रॅ. पासून 1 कि. ग्रॅ. पर्यंतचे काजुचे पॅकेट येथे 1100 रूपये किलो दराने उपलब्ध आहेत. या स्टॉलवर भाजनीचे पिठही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
 
40 किलो लसून-मिरची पापळांची विक्री
 
नागपूर महानगरपालिकेंतर्गत सहकार्य बचत गट आणि नांदेड जिल्हयातील धर्माबाद नगर परिषदेंतर्गत अंबिका बचत गटाचे स्टॉल्स या प्रदर्शनीच्या प्रवेशालाच आपणास बघायला मिळतात. अंबिका बचतगटाचे लसून मिरची पापळ प्रदर्शनीस भेट देणा-यांच्या पसंतीस उतरत आहेत. या बचतगटाच्या अनिता पाटील सांगतात, आतापर्यंत 40 किलो पापळांची विक्री झाली आहे. पापळांसोबतच गोळा भाजी मसाला, चहा मसाला, उपवासाचे दोसे आदी जिन्नसही येथे आहेत. ज्योती हकरे यांच्या सहकार्य बचतगटावरील नाचणी, बीट, तांदूळ ,पालक व बटाटयाचे पापळ खास आकर्षण ठरत आहेत.              
 
‘गोडी शेव’, ‘बाजरा भाकरी’ व ‘चिकन कोरमा मसाला’ही ठरतेय आकर्षण
 
अहमदनगर महानगर पालिकेंतर्गत ओंकार बचत गटावरील आकर्षक पॅकेटमधील बाजरी भाकरी, गोडी शेव ,रेवडी येथे विक्रीस आहे. तर दिल्लीकरांना भावनारी खास शेंगदाना चिक्कीही येथे आहे. या स्टॉलवरील बाजरी भाकरी लोकांच्या खास पसंतीस पडत असल्याचे ओंकार बचतगटाच्या द्वारका कदम सांगतात.
 
धुळे महानगर पालिकेअंतर्गत काझी बचत गटाचा स्टॉलही येथे आहे. चिकन कोरमा, बिर्याणी , टिक्का व पावभाजी मसाल्यांसह शेंगदाणा व लसून चटणीही येथे आहे. ‘चिकन कोरमा मसाला’ दिल्लीकरांच्या खास पसंतीस पडत असल्याचे काझी बचत गटाच्या नजमुस्सहर यांनी सांगितले.
 
बृह्नमुंबई महानगर पालिकेंतर्गत दुर्वा बचत गटावर 50 रूपयांपासून ते 1500 रुपये किंमतीची वॉलेट, बटवे आणि बॅग विक्रीस आहेत. नाशिक जिल्हयातील येवला नगर परिषदेंतर्गत सेनापती तात्या टोपे बचत गटावर 2,500 रूपये ते 20,000 रूपये किंमतीच्या ताना शिल्क व पैठणी साडया आहेत. भंडारा नगर परिषदेंतर्गत श्रमण बचत गटावर 50 ते 1000 रूपये किंमतीचे रेशीम दागीणे, याच नगरपरिषदेंतर्गत शांती बचत गटाच्या स्टॉलवर मातीची भांडी असून 300 रूपये किंमतीची पाण्याची बॉटल विशेष आकर्षण ठरत आहे. झुंबर, कप, दिवे, वैविद्यपूर्ण चित्ररेखाटलेले मातीचे माठ याठिकाणी विक्रीस आहेत. भंडारा नगरपरिषदेअंतर्गतच आसावरी बचत गटाच्यावतीने विक्रीस ठेवण्यात आलेल्या खास कापडाच्या ‘समोसा बॅग’ आकर्षण ठरत आहेत. सातारा जिल्हयातील रहिमतपूर नगर परिषदेंतर्गत जय दुर्गा बचत गटाच्या स्टॉलवरील तीळ, कारळ आणि जवसाची चटणी तसेच चखली व अनारशाच्या पिठालाही प्रदर्शनीस भेट देणा-या ग्राहकांची पसंती मिळत आहे.