1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (07:44 IST)

विद्यार्थ्यांना थेट पहिलीमध्ये प्रवेश, ‘शाळापूर्व तयारी अभियान’ उपक्रम सुरु

Pre-School Preparation Campaign
जून 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांची अंगणवाडीमधील दोन वर्षे वाया गेली आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना थेट पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. परंतु यापूर्वी या विद्यार्थ्यांची मानसिक तयारी म्हणून या विद्यार्थ्यांना बडबड गीते, रेषा काढणे, परिसर, बिंदू जोडणे यांची तोंडओळख करून देण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात सहज, सोपी व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून याकरीता ‘शाळापूर्व तयारी अभियान’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जून 2022 मध्ये पहिलीच्या वर्गासाठी दोन वर्षांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून अंगणवाड्या बंद होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अंगणवाडीतील शिक्षणाला मुकावे लागले आहे. त्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना शब्द ओळख, परिसर ओळख, चित्राचे बिंदू जोडणे, बडबड गीते आदी संकल्पनांपासून वंचित राहावे लागले आहे. विद्यार्थ्यांच्या वयाच्या निकषानुसार त्यांना आता नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार नसून थेट पहिलीमध्येच प्रवेश घ्यावा लागणार आहे.
 
या विद्यार्थ्यांचे पहिलीपासून सुरू होणारे शिक्षण सहज, सुलभ व सोपे होणे अपेक्षित आहे. जेणेकरून त्यांना शिक्षणाची भीती वाटता कामा नये, तसेच त्यांची मानसिक तयारी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बालकांची अपेक्षित शाळापूर्व तयारी व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून शाळापूर्व तयारी अभियान उपक्रम हाती घेतला आहे. शाळापूर्व तयारी अभियानात दोन टप्पे असून पूर्व प्राथमिक शिक्षणातील भाषा, गणित, परिसर विकास आदी विषयांसह विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.