आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये - जयंत पाटील
मुस्लिम आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिम आरक्षणासाठी नेहमीच आग्रही राहिला आहे. मराठा आरक्षण हे मुस्लिम आरक्षणाच्या आड कधीच आलेले नाही. मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण हे वेगळे विषय आहेत. पण जर यासंदर्भात एमआयएमच्या आमदारांनी याचिका दाखल केली असेल तर ते चुकीचं आहे, आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये, असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आरक्षणाबाबत वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी अपयश सिद्ध केले 'सर्वच जाती-धर्माच्या व्यक्ती आज आरक्षण मागत आहेत. सर्वांना आरक्षण दिल्यावरही ९० टक्के युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, त्यामुळे आरक्षण हा पर्याय नाही असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करून आपले अपयश सिद्ध केले आहे असे ते म्हणाले. तरुणांसाठी या सरकारला रोजगार निर्माण करता आला नाही हे या सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचेही ते म्हणाले.