शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (16:58 IST)

शिवाजी फक्त नाव असून चालत नाही, आचार-विचारही तसे लागतात

डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागताचा मेळावा आज  जुन्नर तालुक्यातील  नारायणगावयेथे झाला. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  यांनी भाजपा-शिवसेना सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, देशाचे महत्वाचे नेते नितीन गडकरी स्वतः सांगत आहेत की, मला काम करायचे आहे, पण मला काम करू दिले जात नाही. या सरकारच्या काळात स्वतःच्या मंत्र्यालाच काम करू दिले जात नाही, अशी परिस्थिती आली आहे. आम्ही जनतेला विश्वासात घेऊन काम करत होतो. आमचे सरकार असताना आम्ही पुणे जिल्ह्यात अनेक कारखाने आणले, पण आज तेच कारखाने बंद पडू लागले आहेत.
 
या शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमच्या मनात जो उमेदवार आहे, तो उमेदवार आम्ही देऊ. पण तुम्ही आता जागे व्हा, असे आवाहनही अजितदादांनी केले. हे भाजपाचे सरकार फक्त गाजर देते आहे पण त्या गाजरालासुद्धा आज बाजार नाही. त्या गाजरालाही आता लाज वाटू लागली असेल, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेवरही त्यांनी टीकास्त्र सोडले.
 
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील  यांनीही मार्गदर्शन केले. शरद पवारसाहेबांनी आपल्या जुन्नर तालुक्यात वल्लभशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली पाच धरणे बांधली. त्याचमुळे आज येथील शेतकरी सुखी आहेत, असे त्यांनी नमूद केले. मोदी सरकारची सगळी धोरणे फेल झाली आहेत, असेही वळसे पाटील म्हणाले. आता आपल्याला योग्य उमेदवार निवडून द्यायला हवा, असेही ते म्हणाले.
 
या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांचेही भाषण झाले. मी अनेकदा राजकीय सभांना हजेरी लावली आहे, पण माझ्या स्वागत मेळाव्याला इतकी मोठी गर्दी होईल, असे वाटले नव्हते. पण आज माझ्या लोकांना हे पटले आहे की, आमच्या मुलाचे भविष्य योग्य माणसांच्या हातात आहे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे माझ्यावर टीका करणाऱ्यांची संस्कृती आणि माझी संस्कृती यांच्यात मोठा फरक आहे. मी छत्रपतींच्या भूमीतून आहे. या भूमीने मला थोरा-मोठ्यांचा आदर करायला शिकवले आहे. माझ्यापेक्षा मोठी व्यक्ती तोल सोडून माझ्यावर टीका करत असेल, तरी मी त्यांच्यावर त्यांच्या भाषेत टीका करणार नाही, असेही ते म्हणाले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. आजचे राज्य मूठभर लोक आणि उद्योगपतींचे आहे. पुलवामाची घटना दुर्दैवीच होती, पण नोटबंदी दहशतवाद रोखण्यासाठी असे सांगण्यात आले होते, तर दहशतवाद का थांबला नाही? मग नेमकी नोटबंदी झाली कशासाठी, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. देशापुढील सगळे प्रश्न सोडवण्याची ताकद एकाच नेत्यात आहे, ते म्हणजे शरद पवार, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. शिरूरचे विद्यमान खासदार स्वतःला शिवनेरीचा शिलेदार म्हणवून घेतात. पण १५ वर्षांत एकदाही पंतप्रधान वा कुणी केंद्रीय मंत्री शिवनेरीवर आले नाहीत. या १५ वर्षांत शिवनेरी राष्ट्रीय स्मारक म्हणूनही घोषित झाले नाही. शिवाजी महाराजांचे फक्त नाव असून चालत नाही, त्या गोष्टी आपल्या आचार-विचारात आणाव्या लागतात, असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला. माझी जात काढणाऱ्यांना म्हणाव की, माझी जात ही शिवाजी महाराजांचा मावळा आहे, असेही त्यांनी ठणकावले.