अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI नंतर ईडीकडून गुन्हा दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आता CBI नंतर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने देशमुख यांच्याविरोधात ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे.
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख गृहमंत्री असताना निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेला प्रतिमहिना १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलं होतं. या प्रकरणी जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने चौकशी करुन गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ आता ईडीने देखील पैशांची अफरातफर झाली का? याची चौकशी ईडी करणार आहे.