मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (21:25 IST)

तब्बल 1 कोटीहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

edible oil
उच्च दर्जाचे तेल असल्याचे भासवत भेसळयुक्त तेल विक्री करून ग्राहकांची फसवणूक केल्या जात असल्याच्या संशयातून अन्न व औषध प्रशासन विभागाने नाशिकच्या शिंदे येथील नायगाव रोडवरील मे. माधुरी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर छापा टाकला आहे. यात तब्बल 1 कोटी 10 लाख 11 हजार 280 रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.
 
अन्नसुरक्षा सप्तांतर्गत अन्न व औषध प्रशासनामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. खाद्यतेलाचे नमुने तपासले जात आहेत. दिल्ली येथील अन्नसुरक्षा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात नामांकित ब्रँडसह अन्य खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत याचा अनुषंगाने नाशिक तालुक्यातील माधुरी रिफायनर्स या कारखान्यातील खाद्य तेलाच्या डब्यांवर लेबल दोष आढळून आला आहे.
 
अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी विशेष मोहिम अंतर्गत अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे अन्नसुरक्षा अधिकारी यांचे समवेत शिंदे गाव येथे ही धाड टाकली. यावेळी विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा 1 कोटी 10 लाख 11 हजार 280 रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. लेबल दोष व भ्रामक जाहिरात असल्याच्या कारणावरून तसेच अन्न पदार्थ अप्रमाणित असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. खाद्यतेल फोर्टीफाईड नसल्याची दाट शक्यता असल्याने खाद्यतेलाचे सात नमुने घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा विभागाचे सह आयुक्त, नाशिक विभाग गणेश परळीकर व सहाय्यक आयुक्त( अन्न) परिमंडळ 4 चे विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
 
लेबलवर केलेल्या दाव्यात फोर्टीफाईड खाद्य तेलाचा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रत्यक्षात मात्र पल्सएफ चा सिम्बॉल नाही त्यामुळे ते खाद्यतेल फोर्टीफाईड नसल्याची दाट शक्यता असल्याने अन्य सुरक्षा विभागाने कंपनीतील वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यतेलाचे सात नमुने ताब्यात घेऊन कंपनीतील साठा जप्त केला आहे . अन्न शिजवण्यासाठी गृहिणी जे तेल वापरतात, त्यातील सुमारे 50 टक्के तेल वापरण्यास योग्य नसून ते भेसळयुक्त होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .
 
आगामी काळात सण उत्सव येऊन ठेपलेले असताना अश्या काळात खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते त्यात तळलेल्या पदार्थांचा देखील समावेश असतो .अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तेलाची विक्री शहरात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सण-उत्सवाचा पार्श्वभूमीवर केलीली हि कारवाई मोठी कारवाई समजली जात आहे.