गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (10:27 IST)

एकनाथ शिंदे म्हणतात, की मराठा समाजासाठी शेवटपर्यंत लढणार, आरक्षण देणार म्हणजे देणार

बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे हे मीडियाने लोकांना दाखवावं. आझाद शिवसेनाचा मेळावा आझाद मैदानावर होतोय, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.अब्दुल सत्तार कार्यकर्त्यांमध्ये बसले आहेत. मी सुद्धा असाच बाळासाहेबांच्या सभेत समोर बसायचो.बाळासाहेबांचे विचार मैदान बसून ऐकणारा शिवसैनिक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय, असंही त्यांनी म्हटलं.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानातून होत असलेल्या दसरा मेळाव्यात हे वक्तव्यं केलं.
 
मैदान नाही, विचार महत्त्वाचा आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार, तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
मी शिवतीर्थावर दसरा मेळावा करू शकलो असतो, पण राज्यात कायदा-सुवव्यस्था राखणं हे मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
 
ज्या काँग्रेसचे बाळासाहेबांनी वाभाडे काढले त्यांचे गोडवे आज गायले जातायत.ज्या मणिशंकर अय्यर यांना बाळासाहेबांनी जोडे मारले त्याच काँग्रेसचे जोडे आज हे उचलतायत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
 
‘यांना खोके नाही कंटेनर लागतात’
न्यायालयाने धनुष्यबाण आपल्याला दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी बँकेकडे मागितले. नंतर त्यांनी ते पत्र आपल्याला पाठवलं. मी क्षणाचाही विलंब न करता ते पैसे त्यांना द्यायला सांगितले, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
यांना खोके पुरत नाहीत. यांना कंटेनर लागतात. याचा साक्षीदार माझ्याशिवाय दुसरा कोण असू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
 
शिवतीर्थावरील मेळावा दसरा मेळावा नाही तो शिमगा आहे. वर्षभर शिंदे, मोदींच्या नावाने शिमगा सुरू असतो.आताही तिथे टोमणे सुरू असतील, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका मुख्यलयासमोर होणारी शिंदेंची ही सभा त्यादृष्टीने देखील महत्त्वाची मानली जात आहे.
 
या सभेच्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे याची प्रतिमासुद्धा मांडण्यात आली आहे.
 
आतापर्यंत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांमध्ये व्यासपीठावर बाळसाहेब ठाकरे, मिनाताई ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रतिमा ठेवल्या जात होत्या. पण शिंदेंच्या सभेत मात्र बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोनच प्रतिमा ठेवण्यात आलेल्या.
 
‘पोटात एक, ओठात एक असं आमचं काम नाही’
2004 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण जॅक लागत नव्हता., असा दावाही एकनाथ शिंदेंनी केला.
 
पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली आणि ठाकरेंच्या नावाची शिफारस करण्याची विनंती केली. यांच्या एका चेह-याच्या मागे अनेक चेहरे लपलेले आहेत. पोटात एक, ओठात एक असं आमचं काम नाही. मी शेवटपर्यंत कळू दिलं नाही. आणि तीच आपली कमाल आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
 
हे मुख्यमंत्री बनण्यासाठी संधीसाधू बनले, असा आरोप त्यांनी केला.
 
कार्यकर्त्यांच्या सुख:दुखात सहभागी व्हावं लागतं, त्यांना आधार द्यावा लागतो, तेव्हा पक्ष मोठा होतो.तुम्ही आरशात पाहिलात तर तुम्हालाही तुमची लाज वाटेल, इतके मुखवटे तुम्ही लावलेत, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
मुख्यमंत्री झालो तरी मी कार्यकर्ता होतो, आहे आणि उद्याही असेन. इथे आलेल्या प्रत्येकाला मी माझा मुख्यमंत्री समजतो. मुख्यमंत्रीपद ही तुमची मक्तेदारी, मालकी नाही, असंही त्यांनी म्हटलं.
 
कोव्हिड काळात जीव धोक्यात घालून फिरलो
मी जी-20 च्या परिषदेतही उपस्थित असतो आणि मुंबईच्या नालेसफाईची पाहणीसुद्धा करतो. दावोसमध्येही असतो आणि गोरगरीबांच्या शौचालयांची पाहणी करायला जातो, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा आपला प्रवास असल्याचं नमूद केलं.
 
कोविडच्या काळात तुम्ही घरी बसला होता आणि हा एकनाथ शिंदे पीपीई किट घालून पोलिसांना, डॉक्टरांना भेटला. मी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे सर्व करत होतो, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर कोव्हिड सेंटरमध्ये पैसे खाल्ल्याचा आरोप केला.
 
मला अनेकजण म्हणाले की इर्शाळवाडीत जाऊ नका. पण हा एकनाथ शिंदे चिखल तुडवत वर पोहोचला. तुम्ही आलात व्हॅटिनी व्हॅनमध्ये बसलात, मीडियाशी बोललात आणि निघून गेलात, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
देशाची जनता INDIA या दहा तोंडी रावणाचं दहन करेल
तुम्ही जे जे बंद केलं ते आम्ही सुरू करतोय, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारने काय केलं हे सांगितलं.
 
एक रूपयात पीक विमा देणारं हे राज्यातील पहिलं सरकार आहे. एमसीएलला मिळणा-या नफ्यांपैकी 50 टक्के नफा शेतक-यांना मिळणार, असं त्यांनी म्हटलं.
 
मोदीजींमुळे अर्थववस्था सुधारली. आता एक ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य आहे. नरेंद्र मोदी आपला एकही प्रस्ताव नाकारत नाहीत, असंही त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं.
 
यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना तयार केलाय. त्यांनी आपल्या पोटदुखीवर तिथे उपचार करावा, असा टोला लगावताना या देशाची जनता INDIA या दहा तोंडी रावणाचं दहन करेल, असं त्यांनी म्हटलं.
 
मराठा समाजासाठी शेवटपर्य़ंत लढणार
 
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावरही भाष्य केलं.
 
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, मी सर्वसामान्य मराठा कुटुंबातला आहे. मला मराठा समाजाच्या वेदनेची जाणीव आहे.
 
आपण सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केलेली आहे. आपली एक विंडो खुली झालेय, असं त्यांनी म्हटलं.
 
मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार. मराठा समाजासाठी हा एकनाथ शिंदे शेवटपर्यंत लढणार, असं आश्वासन त्यांनी दिलं.
 
मी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, असं म्हणत एकनाथ शिंदे पोडियम सोडून एकनाथ शिंदे महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी मराठा तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका असं आवाहन केलं.
 
आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही, हे आज मी बोलू शकत नाही. पण योग्य वेळी मी ते बोलेन, असंही त्यांनी म्हटलं.
 
'गर्व से कहो हम काँग्रेसके साथ है', हे म्हटलं तर आपल्याला चालेल का?
उद्धव ठाकरेंच्या काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली.
 
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, हे कधी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करतील हे सांगता येत नाही. उद्या एमआयएम आणि ओवेसी यांच्यासोबतही यांची युती होईल. हे हिजबुल मुजाइद्दीन, लष्कर-एच-तोयबा यांची गळाभेट घेतील.
 
बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. रथयात्रा कुणी अडवली, कारसेवकांवर गोळीबार कुणी केला, हे सर्वांना माहित्येय. गर्व से कहों हम काँग्रेसके साथ है, हे म्हटलं तर आपल्याला चालेल का? असं म्हणत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.
 
 
“शिवसेनाप्रमुख राम मंदिर, काश्मीरच्या बाबतीत बोलत होते. पाकिस्तान केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना घाबरत होते. राम मंदिर बनवण्याचं हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी साकार केलं,” असं रामदास कदम यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
 
जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण माझी एक विनंती आहे यापुढे कोणाची आहुती जाता कामा नये. तुम्ही तज्ज्ञांचं मत घ्या. आरक्षण मिळालं पाहिजे पण भावनात्मक जाऊ नये तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कोकणातील परिस्थिती वेगळी आहे म्हणून मी तशी भूमिका घेतली, असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
 
'सर्वांत जास्त दौरा करणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे'
एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी गुलाबराव पाटील यांचं भाषण झालं.
 
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, शिधा शंभर रूपये केला तरी म्हणतात शिंदे सरकार काहीत करत नाहीतमुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून सव्वाशे कोटी रूपये दिले.पाणी पुरवठा योजनेत जलजीवन अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पुढाकारेने ३५ हजार गावांमध्ये योजना सुरू केल्या.
 
महाराष्ट्राचा सर्वात जास्त दौरा करणारा कुणी मुख्यमंत्री असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे, असंही त्यांनी म्हटलं.
 
 



















Published By- Priya Dixit