रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 10 जानेवारी 2022 (15:46 IST)

निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान, भाजप नेत्यांना द्यावेत : राऊत

मुंबई : निवडणूक आयोगाने प्रचारावर काही निर्बंध घातले आहेत, ऑनलाईन प्रचार करा असे त्यांनी सांगितले आहे. पण हे कागदावर सगळे ठिक आहे. मात्र, निवडणूक आयोगाने याप्रकारचे स्पष्ट आदेश पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना द्यावेत. कारण त्यांच्यासाठी कोणते नियम नसतात. इतरांसाठी नियम असतात. हे आम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत बघितले आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या बाबतीत तरी समान कायदा असावा असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
 
माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर हा दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रात भायवह अशा प्रकारची स्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर रुग्णांची नोंदच होत नाही, त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशमध्ये काय होईल हे सांगता येत नसल्याचे वक्तव्य राऊत यांनी केले. निवडणूक आयोगाने निवडणुका वेळेत जाहीर केल्या हे ठीक आहे, मात्र, लोकांचे आरोग्य, त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, याचा विचार निवडणूक आयोगाने केला नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तसेच काही दिवस निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, पण काही जणांना निवडणुका उरकण्याची घाई झाल्याचे राऊत म्हणाले. निवडणुका होत असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चांगली नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत. त्यांनी पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना, नेत्यांना निर्बंध पाळण्याचे आदेश द्यावेत असे राऊत म्हणाले.
 
…तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्ष एकत्र येतील
गोव्यात काँग्रेसबरोबर आघाडी व्हावी असे आम्हाला सतत वाटत आहे. त्यामुळे आम्ही आणखी आघाडी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रासारखा एक प्रयोग गोव्यात करावा असे आम्हाला वाटत आहे. आम्ही यासाठी मनापासून प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना वाटते की, गोव्यात ते स्वबळावर सत्ता आणू शकतात. तसे संकेत काँग्रेसने दिल्लीत दिले असतील, त्यामुळेच ते मागे पुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा ऑफर केल्या आहेत, पण आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे एकत्र निर्णय व्हायला हवा असेही राऊत यावेळी म्हणाले. आम्हाला जागा ऑफर केल्या म्हणजे आम्ही लगेच जाऊ असे नाही. त्यामुळे आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाहीतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
 
पक्षाचा विस्तार करण्याचा सर्वांना अधिकार
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्यात काही गैर नाही. मोठ्या पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी करणं कठीण असतं. आमची आघाडी राज्यासाठी आहे. जिथे आघाडी शक्य तिथे लढू, जिथे शक्य नाही तिथे लढणार नाही. पक्षाचा विस्तार करण्याचा सर्वांना अधिकार आहे. कधीकाळी भाजप आणि सेना देखील स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगळे लढले आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.