शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (22:08 IST)

पोलीस निरीक्षकाच्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांची चक्क डान्स पार्टी

फोटो साभार -सोशल मीडिया एरवी रस्त्यावर पार्ट्या करणाऱ्या तरुणांना वठणीवर आणण्याचं काम पोलीस करत असतात. मात्र पोलिसांनी जर थेट पोलीस ठाण्यातच पार्ट्या अन् डान्स केला तर? हो असं झालंय.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांची चक्क डान्स पार्टी झाल्याचे पाहायला मिळालं.

अधिकाऱ्यांना खांद्यावर बसवत कर्मचाऱ्यांनी जल्लोषात हिंदी चित्रपट गीतावर डान्स केला. यावेळी हे पोलीस स्टेशन आहे की एखाद्या ठिकाणच्या लग्नातील हळदीचा कार्यक्रम? असाही प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान, अधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या डान्स पार्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांकडून सर्वसामान्यांवर अनेकदा नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली जाते. मात्र पोलिसांकडूनच जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होतोय. 'इधर उधरकी बात' करण्यापेक्षा के. के. पाटील यांनीच काही दिवसांपूर्वी किर्तनाच्या सोहळ्यात घुसून किर्तन बंद केलं होतं.

नारदाच्या गादीवर पाय ठेवून कीर्तनकारांना धमकी केल्याप्रकरणी चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक के के पाटील हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. हे प्रकरण शांत होतं नं होतं तोच आता के. के. पाटील हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.