बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (09:10 IST)

ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा

ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अल्पसंख्यांकांचा दर्जा द्यावा, समाजाच्या बदनामी विरोधात कायदा करावा आदी मागण्यांचे निवेदन ब्राह्मण समाजाच्या संघटनांच्या वतीने सर्व पक्षीय नेत्यांना देण्यात आल्याची माहिती पुण्याच्या माजी मेधा कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 
संघटनांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन निवेदन दिले. आर्थिक विकास महामंडळ, इनामी जमिन खाजगी मालकीची करुन देणे, पुरोहितांना मानधन देणे, दादोजी कोंडदेव आणि भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुनर्स्थापित करणे, प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधणे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे आदी मागण्यांचे निवेदन नेत्यांना देण्यात आले.
 
ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळासह जयंत पाटील यांनी मंत्रालयातील मंत्री दालनात बैठक घेतली. आर्थिक महामंडळ आणि अन्य मागण्यांबाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना याबाबतीत कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.
 
इनामी जमिनीसंदर्भात अन्याय होत असलेल्या ब्राह्मण शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आणि पुढील कारवाई लवकरच होईल असे आश्वासन दिले.
 
रिपब्लिकन पक्षाचा ब्राह्मण समाजाच्या मागण्या़ंना पूर्ण पाठिंबा असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आणि मागण्या मान्य कराव्यात असे पत्र मुख्य मंत्र्यांना पाठवतो असे आश्वासन दिले.