मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (16:08 IST)

फडणवीस यांची खोचक प्रतिक्रिया, केंद्राकडे बोट दाखवायचं, ती योग्य प्रथा नाही

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  या भेटीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली हे चांगलं आहे. नाहीतर आपल्याकडे जी प्रथा पडली आहे, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं, ती योग्य प्रथा नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसंच, अशा चर्चांमधून महाराष्ट्राचा फायदाच होईल, असं देखील फडणवीस यांनी नमूद केलं.
 
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला केंद्र सरकारशी समन्वय साधण्याचा सल्ला दिला. “महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील, तर ते चांगलंच आहे. आम्ही तर हेच नेहमी सांगत असतो. कारण पंतप्रधान महाराष्ट्राबद्दल सकारात्मक असतात. राज्य आणि केंद्र यांनी आपापसांत संबंध चांगले ठेवले, तर राज्याचा फायदा होतो. आपल्याकडे जी प्रथा आहे की उठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचं, ही प्रथा योग्य नाही. आज मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला, जाऊन भेट घेतली हे चांगलंय”, असं ते म्हणाले.
 
“अशा प्रकारच्या बैठकांमधून समन्वय साधला जातो. राजकारण निवडणुकीपुरतं असतं. पण इतर काळ समन्वयाची भूमिका असली, तर राज्याचा फायदा होतो. केंद्र सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र सातत्याने राहिला आहे. त्यासंदर्भात भूमिका योग्य ठेवली, तर महाराष्ट्राचा त्यात फायदाच आहे”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.