गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (16:46 IST)

अजित पवारांसोबतच्या शपथविधीमुळे प्रतिमेला तडा गेला - फडणवीस

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने होतच राहते. आता मात्र स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
 
अजित पवारांसोबतच्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं हा चुकीचा निर्णय होता. राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायला नको होतं."

तसंच, अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मात्र, त्या शपथविधीला समर्थन देण्याचाही प्रयत्न फडणवीसांनी केला. ते म्हणाले, "ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केलं. परंतु ते चुकीचं होतं आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. त्यांच्यात माझी जी प्रतिमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला."
आपला तो निर्णय चुकीचाच होता, पण त्याचा आता पश्चाताप नाही, असंही फडणवीसांनी नमूद केलं.