संभाजीराजे छत्रपतींनी ट्विटद्वारे शिवकालीन ‘होन’चा अत्यंत दुर्मिळ फोटो शेअर
भाजप खासदार संभाजीराजे छत्रपतींनी दोन दिवसांपूर्वीच शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींनी ट्विटद्वारे शिवकालीन होनचा अत्यंत दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन होनच्या साक्षीने साजरा होणार आहे,असे संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढे ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, स्वराज्याचे सार्वभौमत्न व संपन्नतेचे प्रतीक असणारा होन हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे. हा राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडाच्या पवित्र भूमीत मिळालेल्या ऐतिहासिक होनच्या साक्षीने यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार,असे संभाराजीराजे छत्रपतींने म्हटले आहे.
गेल्या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करता आला नाही. यंदाही राज्यात कोरोनाचे सावट कायम आहे. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय उत्सव व्हावा ही माझी मनापासून इच्छा असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले. गेल्या वर्षीही लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले असता ते घरी राहिले त्यांचे मी आभार मानतो. यंदाची परिस्थितीही तशीच आहे. त्यामुळे शिवराय मनामनांत शिवराज्याभिषेक दिन घराघरांत या भावनेतून हा सोहळा साजरा करा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी शिवप्रेंमींना केले आहे.