गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (08:22 IST)

कुपोषण मुक्तीसाठी मुलांना नागलीची पेज खाऊ घाला : मंत्री डॉ. भारती पवार

Feed children nagli page for malnutrition: Minister Dr. Bharti Pawar
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात सामाजिक लोकसहभागातून कुपोषण मुक्तीसाठी लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. डॉ. पवार या उंबरठाण येथे” एक लढा कुपोषण मुक्तीसाठी” या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी डॉ. पवार म्हणाल्या की, आदिवासी भागातील माता मृत्यू दर, बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणाला डॉक्टर, अधिकारी, देशसेवा करायची असेल तर कुपोषण मुक्ती प्रथम झाली पाहिजे. वाढदिवसाच्या दिवशी कुपोषित बालकांना पोषण आहार देऊन वाढदिवस साजरा केला तर खरोखरच समाधान मिळते. तालुक्याला पुढे जायचे असेल तर तालुका कुपोषण मुक्त झाला पाहिजे. कुपोषण रोखण्यासाठी नागलीची पेजचा वापर करावा. ज्या पद्धतीने कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे, तसेच कुपोषण हळूहळू कमी केले पाहिजे.
 
सुरगाणा तालुक्यात अती तीव्र कुपोषित ११ बालकं तर तीव्र कुपोषित ९४ बालके आहेत. वजन कमी, गर्भधारण काळातील धोका हि लक्षणे दिसताच गावातील सुईन, दाईन, तज्ञ माता यांना वर्षानुवर्षे कामाचा अनुभव होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसतांना अचुकपणे प्रसूती घरच्या घरी केली जात होती. आज नवीन तंत्रज्ञान विकसित झाले तरीही आरोग्य केंद्रात प्रसूती केल्या जात नाहीत. त्याना तालुक्यात, जिल्ह्यात का पाठवले जाते असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.
 
काय असते नागलीची पेज?
 
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नागलीची (नाचणी) लागवड केली जाते. त्याचबरोबर कालवण सुरगाणा, इगतपुरी, पेठ आदी आदिवासी भागात नागलीला विशेष महत्व आहे. त्यामुळे नागली आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. नागलीपासून विविध पदार्थ बनवता येतात. त्यामध्ये लहानापासून ते मोठ्यांपर्यत नागलीची पेज हा पदार्थ खाऊ शकतो. नागलीमधे क, ई, बी कॉम्पलेक्स सारखी जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शियम, अँण्टिऑक्सिडण्टस, प्रथिनं, फायबर आणि पुरेशा प्रमाणात उष्मांक ( कॅलरी) आणि गुड फॅटस असतात.त्यामुळे कुपोषण मुक्तीसाठी हा रामबाण उपाय ठरतो यासाठी नागलीची पेज मुलांच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.