राज्य सरकारचं काम संथगतीनं सुरू – डॉ. भारती पवार
राज्य सरकारने लसीची मागणी केली आहे. आम्ही राज्याच्या मागण्या पूर्ण करत आहे. आता राज्याने काम करण्याची गरज आहे. सध्या राज्य सरकारचे काम संथ गतीने सुरू आहे. राज्य सरकार काम करत आहे परंतु राज्य सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमायक्रॉनबाबत आज केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आढावा घेतला आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. या संदर्भात राज्याने वेळीच पावले उचलायला हवी.
प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्याला दिले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून त्यांनी या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने नियमावली देत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्यातील आरोग्य सचिवांसोबत चर्चा करत आहे, असे देखील डॉ. भारती पवार या वेळी म्हणाल्या.