मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (08:18 IST)

भोंदू कालीचरण महाराजावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा : नवाब मलिक

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे दोन दिवसीय धर्म संसद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आले होते. अकोल्याच्या कालीचरण महाराज याने या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजावर हल्लाबोल केला आहे. अकोल्याचा कालीचरण महाराज हा भोंदूबाबा; त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा! असं म्हटलं आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने स्वीकार केली. फर्जीबाबा अकोल्याचा रहिवासी असून नाव कालीचरण महाराज आहे. संपूर्ण ट्विटर बघा, सोशल मीडिया बघा, बातम्या बघा या फर्जीबाबाने राष्ट्रपित्याबद्दल अपशब्द काढले. तो कार्यक्रम कुठेही झाला असेल, तो अकोल्याचा रहिवासी आहे. बापूंच्या विचारांना विरोध असू शकतो. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा… महात्मा गांधींचा अवमान करत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.