शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (14:34 IST)

अखेर व्हीजेटीआयच्या ‘त्या’प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल

- मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाला यश
 
मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनामुळे वीरमाता जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट (VJTI)या संस्थेच्या एका प्राध्यापकाने केलेल्या अश्लील वर्तन आणि विनयभंगाच्या घटनेविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.
 
व्हीजेटीआयमध्ये गणित विषय शिकवणाऱ्या प्रा. बी.जी.बेलापट्टी यांनी प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्याविषयी संबंधित मुलीने व तिच्या पालकांनी लेखी तक्रार व्हीजेटीआयच्या संचालकांकडे केली होती. कालपर्यंत संचालकांनी या घटनेप्रकरणी संबंधित प्राध्यापकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात मुंबई अध्यक्ष अमोल मटेले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या आवारात आंदोलन केले तसेच संचालकांना घेराव घालत परिसरात निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी संबंधित प्राध्यापकावर कठोर कारवाई व निलंबन करण्याची मागणी केली. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत व्हीजेटीआय प्रशासनाने प्राध्यापकाविरोधात तक्रार नोंदवली तसेच हे प्रकरण विशाखा कमिटीकडे सोपवले गेले.