1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2023 (13:56 IST)

राज्यात प्रथमच महसूल सप्ताह : लोकाभिमूख उपक्रम, वाचा काय आहे पूर्ण उपक्रम ?

महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल  दिनाबरोबरच 1 ते 7 ऑगस्ट,2023 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. पुणे विभागातही हा उपक्रम पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयात विभागीय आयुक्त सौरभ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनामार्फत राबविला जाणार आहे. त्यानिमित्त हा माहितीपर लेख…

महसूल विभागातर्फे नागरिकांच्या उपयोगाची दैनंदिन महसूली कामे पार पाडण्याबरोबरच अभिलेखे अद्ययावत ठेवणे, जमीन कर वसूलीची कार्यवाही करणे, जमीन मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे व सुनावणी करणे, वेळापत्रकानुसार महसूली वसुलीचे काम करण्यात येते. हे कामकाज पार पाडताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेणे क्रमप्राप्त असते. आणि म्हणूनच यावर्षी, 1 ऑगस्ट महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. हा सप्ताह साजरा होताना यामध्ये नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. त्यानुसार सर्वत्र लोकाभिमूख असे उपक्रम राबविले जात आहेत.
 
1 ऑगस्ट हा महसूल दिन-या महसूल दिनानिमित्त महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनविन संकल्पना राबविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा दरवर्षी राज्यस्तरावर ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. याच धर्तीवर विभागनिहाय उत्कृष्ट काम करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून गौरव करण्यात येतो.
 
यावर्षी शासनाने याची व्याप्ती वाढवून, महसूल दिनाबरोबरच राज्यात 1 ते 7 ऑगस्ट,2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत सप्ताहभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये नागरिकांचा सहभागही घेतला जाणार आहे.
 
विविध उपक्रम
या महसूल सप्ताहामध्ये, नागरिकांच्या सहभागाने प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ’, 2 ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’,  3 ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’,  4 ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’, 5 ऑगस्ट रोजी  ‘सैनिकहो तुमच्यासाठी’, 6 ऑगस्ट रोजी ‘महसुल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद’ आणि 7 ऑगस्ट रोजी  ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महसूल सप्ताह आयोजनाच्या अनुषंगाने शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी असे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
 
जिल्हाधिकारी तसेच उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्या कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क किंवा हेल्पलाईन अथवा व्हॉट्सअॅपव्दारे मदत करण्याकरीता यंत्रणा स्थापन करुन यासंबधी कक्ष तयार करुन गरजू नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करुन त्यांची कामे पुर्ण करण्यासाठी या कालावधीत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासोबतच महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहिती या सप्ताहात देण्यात येणार आहे.
 
अग्रेसर पुणे विभाग
तर महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती मिळावी आणि त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा या उद्देशाने महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

महसूल सप्ताहात नागरिकांना सहभागी करुन घ्यावे आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करावा. शासनाच्या सर्वच उपक्रमांमध्ये पुणे विभाग नेहमीच अग्रेसर राहिला असून, महसूल सप्ताह आयोजनातही विभागाने आपला नावलौकिक टिकवावा असे स्पष्ट निर्देश पुणे विभागीय आयुक्त श्री.सौरभ राव यांनी दिले असून विभागात होणाऱ्या प्रत्येक उपक्रम हा उत्तम असावा याकडे त्यांचा कटाक्ष आहे.
 
हा उपक्रम लोकाभिमूख व जास्तीत नागरिकांपर्यत पोहोचावा यासाठी उपक्रमाची सर्वांगिण प्रसिध्दी होणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकारा परिषदा, कार्यक्रमांची माहिती असलेले बॅनर्स, फ्लेक्स् तसेच सर्व प्रसिध्दी माध्यमे याचाही उपयोग करुन विभागातील जास्तीतजास्त लोकांपर्यत हा उपक्रम पोहचून त्यांचा शासनाप्रती असलेला विश्वास अधिक वृध्दींगत होईल असा प्रयत्न महसूल विभागाचा आहे. यानिमित्याने नागरिकांनीही या उपक्रमास प्रतिसाद द्यावा.
 
 
Edited By - Ratnadeep ranshoor